भाजपा जात्यात तर शिवसेना सुपात!

Foto
कार्यकारिणी निवडीचा वांधा
कार्यकर्त्यांच्या उंचावलेल्या अपेक्षा, पक्षशिस्त झुगारण्याची बळावलेली वृत्ती आणि बदललेले राजकीय समीकरण यामुळे शहर जिल्हा कार्यकारणी निवडताना भाजप नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे. दुसरीकडे शिवसेनेतही आता फेरबदलाचे जोरदार वारे वाहू लागल्याने तिथेही बदल अटळ दिसतो. या दोन्ही पक्षात उठलेली वावटळ केव्हा वादळाचे स्वरूप घेईल याचा नेम नाही. लाख प्रयत्न करूनही कार्यकर्ते नेत्यांच्या ताब्यात राहणार नाही, अशी एकंदर परिस्थिती आहे.
गेल्या तब्बल सहा-सात महिन्यांपासून भाजप शहर जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. नावांचे कागद नेत्यांच्या कोटात जीर्ण झाले आहेत. दर दोन आठवड्याला बनवलेली यादी फाडली जाते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर बनवलेली यादीही नव्याने दुरुस्त करण्याचे काम जोरात सुरू आहे. पक्षात दानवे- मुंडे गटाचा जुनाच वाद  उफाळून आला आहे. शहर आणि ग्रामीणच्या वादात अडकलेली शहराची कार्यकारणी तर जुन्या-नव्या यांच्या खेळात अडकलेली ग्रामीण जिल्ह्याची कार्यकारणी अजून किती वेळा बदलली जाणार, असा सवाल आता कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. शहर कार्यकारणीवर खा. डॉ. भागवत कराड, आ.अतुल सावे यांचाच वरचष्मा असणार याची दक्षता घेतली जातेय. मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या गटाने जोरदार आक्षेप घेत काही नावांना बदलण्याची मागणी केल्याने तिढा वाढला आहे. कार्यकर्त्यांना युवा मोर्चा तसेच इतर आघाड्यांचे चॉकलेट देऊनही झाले तरीही असंतोष कमी झाला नाही.
शिवसेनेतही खैरे पर्वाचा अस्त होण्याची संधी शोधत असलेल्यांनी पुन्हा मोर्चेबांधणी केली आहे. शहर आणि जिल्ह्यावर खैरे समर्थकांची वर्णी सध्या आ. दानवे समर्थकांचा डोळ्यात खुपत आहे. त्यामुळेच जिल्ह्याचे संपर्क नेते विनोद घोसाळकर यांच्या समोर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भाकरी फिरवली नाही तर मनपा निवडणुकीत फटका बसू शकतो, असा गुप्त निरोपही देण्यात आला आहे. याच नियुक्त्यावरून अडीच वर्षांपूर्वी राजाबाजार संस्थान गणपती मंदिरात तत्कालीन खासदार खैरे आणि जिल्हाप्रमुख दानवे भिडले होते. त्याचा पुरेपूर वचपा काढण्याची संधी आ. दानवे शोधत आहेत. पक्षात सध्या दानवे गटाची चलती आहे. हे वारे बदलण्यापूर्वीच नियुक्त्यांचा खेळ मांडला जावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसात जर सेनेत नियुक्त्यांचा पोळा फुटला तर त्यांचीही गत भाजप सारखीच होऊ शकते. भाजपमध्ये जसे रावसाहेब दानवे -पंकजा मुंडे गटाच्या सुप्त संघर्षात नियुक्त्या रखडल्या तसाच सत्तासंघर्ष खैरे- दानवे गटात होऊ शकतो. त्यामुळे भाजप आज जात्यात असला तरी शिवसेना सुपात आहे, यात शंका नाही.